| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अलीकडेच 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ मैदानावर आमनेसामने येणार आहेत. मात्र यावेळी हा सामना वरिष्ठ संघामध्ये नसून कनिष्ठ संघांमध्ये होणार आहे. भारताचा कनिष्ठ 19 वर्षाखालील संघ 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान आशिया कप खेळणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. बीसीसीआयने त्यासाठी संघाची घोषणा करताना, संपूर्ण वेळापत्रकही शेअर केले आहे. आठ वेळचा विजेता भारतीय संघ या स्पर्धेत सर्वांच्या आवडीचा असणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, यूएई, जपान, श्रीलंका आणि बांगलादेश हे देशही सहभागी होणार आहेत. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 8 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 डिसेंबरला सामना रंगणार आहे.
या स्पर्धेत प्रत्येकी चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 15 डिसेंबरला होतील, त्यानंतर अंतिम सामना 17 डिसेंबरला होईल.
भारतीय संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक
8 डिसेंबर भारत विरुद्ध अफगाणिस्तान
10 डिसेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
12 डिसेंबर भारत विरुद्ध नेपाळ
15 डिसेंबर – दोन्ही उपांत्य फेरीचे सामने
17 डिसेंबर – अंतिम सामना
19 वर्षाखालील आशिया कपसाठी भारतीय संघ : अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.
राखीव खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन
संघाबरोबर प्रवास न करणारे राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विग्नेश, किरण चोरमले.