105 रक्तदात्यांनी केले रक्तदान
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीबाग येथील कच्छी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशांत नाईक मित्रमंडळ यांनी जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या सहाय्याने आयोजित रक्तदान शिबिराला अलिबागकारांनी भरभरून प्रतिसाद दिला. या शिबिरात 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा शासकीय रक्तपेढीचे संक्रमण अधिकारी दीपक गोसावी यांनी रक्तदानाच्या फायद्याबाबत माहिती देताना सांगितले की, रक्ताला पर्याय नाही, तो निर्माण होऊ शकत नाही, म्हणून आपण रक्तदान करून इतरांना जीवनदान दिले पाहिजे.
18 ते 60 वयोगटातील निरोगी व्यक्ती ज्याचे वजन 45 किलोपेक्षा जास्त आहे ते रक्तदान करू शकतात. दर तीन महिन्यांनी 300 ग्रॅम रक्तदान करता येते.असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अलिबाग नगर परिषदेचे माजी गटनेते प्रदीप नाईक, अक्षया नाईक, सागर पेरेकर, रवी थोरात, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, अशोक प्रधान, कपिल अनुभवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणे आवश्यक आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो, पण इतरांसाठी जगणे ही मोठी गोष्ट आहे. ते जीवनदान करण्यासारखे मानले जाते. रक्तदान केल्याने समोरच्या व्यक्तीचा जीव तर वाचतोच, पण रक्तदात्याला निरोगी होण्यासही मदत होते, त्यामुळे ते दोघांसाठीही फायदेशीर आहे.
- अनिल चोपडा, माजी नगरसेवक अलिबाग नगर परिषद
एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे दोन-तीन रुग्णांचे प्राण वाचतात. नियमितपणे रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते व रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांची लागण होण्याचे प्रमाणही नगण्य राहते; म्हणून निरोगी राहायचे असेल, तर रक्तदान करा. - रवी थोरात,रक्तदाता







