। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सध्या चालु असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी सहज विजय मिळवला होता. तर या स्पर्धेत पाकिस्तानी संघ एकही विजय न मिळवता स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानचा पुन्हा सामना होणार नाही. मात्र, तरीदेखील या वर्षात भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
यंदाच्या वर्षी आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरीही भारत पाकिस्तानचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवले जाण्याची शक्यता आहे. 2023चा आशिया चषक एकदिवसीय फॉरमॅटमध्ये होता. मात्र, 2025चा आशिया चषक टी-20 स्वरूपाचा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता, भारत आणि पाकिस्तानचा संघ एकाच गटात असतो. त्यामुळे या वेळीही दोन्ही संघ पहिल्यांदा साखळी फेरीत भिडतील हे नक्की.