भारताच्या नशीबी सुवर्ण

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारी (दि.7) आश्‍चर्याची गोष्ट घडली. पुरुषांच्या भालाफेकीच्या 41 गटात नवदीप सिंगने रौप्यपदक जिंकून दिले होते. परंतु, या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या इराणच्या खेळाडूवर अपात्रतेची कारवाई केली गेली आणि नवदीपच्या रौप्यपदकाचे रुपांतर सुवर्णमध्ये झाले. यामुळे भारताने 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्यसह एकूण 29 पदके जिंकली आहेत. सध्या भारत पदकतालिकेत 18व्या क्रमांकावर आहे.

हरयाणाच्या नवदीपला 2020च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत 41 प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. शनिवारी त्याने तिसर्‍या प्रयत्नात 47.32 मीटरसह पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली. चीनच्या सून पेंगिझिआंगचा 2021मध्ये टोकियोतील 47.13 मीटरचा पॅरालिम्पिक विक्रम नवदीपने मोडला. इराणच्या सयाह सहेघ बेतने त्याच्या दुसर्‍या प्रयत्नात 46.84 मीटर अंतर पार करून अव्वल स्थान जिंकले होते. परंतु, नवदीपने त्याला मागे टाकले. पण, इराणच्या बेतने त्याच्या पाचव्या प्रयत्नात 47.64 मीटर भालाफेकून भारतीय खेळाडूचा पॅरालिम्पिक विक्रम मोडला आणि अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी त्याला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून वॉर्निंग दिली होती. नवदीपचा सहावा प्रयत्न फाऊल ठरल्याने इराणी खेळाडूचे सुवर्ण अन् भारताचे रौप्यपदक पक्के झाले आणि चिनी खेळाडूला कांस्यपदक मिळाले होते.

पण, सामन्यानंतर इराणच्या खेळाडूला 8.1 या नियमानुसार अखिलाडूवृत्ती किंवा चुकीच्या कृतीमुळे अपात्र ठरवले गेले. त्याला नेमकं कोणत्या कारणावरून अपात्र ठरवले गेले, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. इराणी खेळाडूला अपात्र ठरवल्याने नवदीपचे रौप्य सुवर्ण झाले अन् चीनच्या सूनचे कांस्य रौप्यपदक झाले. इराकच्या विल्डन नुखाईवी याला कांस्यपदक मिळाले.

Exit mobile version