कर्णधार रोहित शर्माचे फलंदाजीतील अपयश आणि पॉवरफ्लेमधील वाया गेलेले चेंडू यामुळे भारतीय संघ पावसाच्या व्यत्ययाच्या सामन्यात अडचणीत आला होता. 3 सामन्यात सतत अपयशी ठरलेला के.एल.राहूल आज मात्र 32 चेंडूत अर्धशतक झळकावू शकला. त्याचे 4 षटकार आणि 3 चौकार भारताच्या डावाला किमान माफक पाया उभारून देऊ शकले. कोहलीच्या साथीने त्याने केलेली 67 धावांची भागिदारी पुढील फलंदाजांना हुरूप देणारी ठरली. पहिल्या षटकात 1 धाव, तिसर्या षटकात 1 धाव यामुळे पॉवरफ्लेचा लाभ भारताने पूर्णपणे गमविला. नंतरच्या म्हणजे उर्वरित 4 षटकात 9, 11, 8, 7 धावसंख्या बांगलादेशाच्या 6 षटकातील बिनबाद धावांच्या तुलनेत अगदीच तुटपुंजी वाटायला लागली. शोरीफुल इस्माच्या, भारताच्या डावातील 9 व्या षटकात आलेल्या 24 धावांनी भारताचा उत्साह वाढविला होता.
विराट कोहलीला पुन्हा एकदा पहिल्या दोन सामन्यातील फलंदाजीचा सूर गवसला होता. मात्र त्यानंतर एकाही षटकात तेवढ्या धावा आल्या नाहीत. बांगलादेशाची झंझावती सलामी पाहिल्यानंतर 185 धावांचे लक्ष्य देखील कमी वाटायला लागले होते. सुर्यकुमारच्या 16 चेंडूतील 30 धावा, अश्विनच्या 6, चेंडूतील 13 धावा यांच्या डावाभोवती कोहलीची 64 (नाबाद) खेळी उभी राहिली. त्यांचे 8 चौकार खणखणीत होते. लॉगऑनवर मारलेला उत्तुंग षटकार हाच त्याने चेंडू हवेतून उंचावर मारलेला एकमेव फटका होता. त्याचे अन्य चौकार हसनला मारलेला हुक, मुस्ताफिझुरला पायातून काढलेला फाईन लेग क्लीक, इस्लामच्या गोलंदाजीवर मारलेला ड्राईव्हज, यामुळे क्रिकेट रसिकांना दर्जेदार क्रिकेटची चव चाखता आली.
सुर्यकुमारचे हवेतले फटके आणि अखेरच्या षटकातील निम्मेचेंडू खेळूनही अश्विनने काढलेला 1 षटकार व 1 चौकारासह 11 धावा यामुळे भारतला 184 धावसंख्या गाठता आली.
बांगलादेशाचा डाव सुरू असताना अॅडलेड मैदानावर अवतरलेल्या वरूणराजाने त्यानंतर सर्वांचीच झोप उडविली. आम्ही येथे जिंकायला कुठे आलोय! असं काल म्हणणार्या शकिबच्या बांगलादेश संघाने भारतीय संघाच्या तोंडाला आज फेस आणला होता. पावसाच्या व्यत्यय आणि त्यानंतरचा क्रिकेटचा थरार एखाद्या रहस्य प्रधान चित्रपटाला शोभेल असा होता. प्रत्येक विकेट आणि प्रत्येक चौकार-षटकारचा फटका हृदयाचे ठोके वाढवित होता. अखेर विजश्रीने भारताच्या गळ्यात माळ घातली. विजय आणि पराजय यातले अखेरच्या चेंडूवरचे लक्ष्य बांगलादेशाच्या हातून निसटलेच. बांगलादेशाला धडाकेबाज सुरूवात करून देणारा लिस्टन दास (27 चेंडूत 60 धावा) याची फलंदाजीच लय पावसाच्या व्यत्ययाने तुटली. त्यानंतर के.एल.राहुलच्या एका अचूक थेट चेंडू फेकीने त्याची खेळी तेथेच संपली. 16 षटकात विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य नजरेसमोर असलेल्या बांगलादेशाला नुरूल हसनचा (25) अपवाद वगळता मोठी खेळी करणारा फलंदाज सापडला नाही. आपल्या दुसर्या षटकात 2 बळी घेणारा अर्षदीप आणि त्याला साथ देणार्या हार्दिक पंड्याचे एका षटकातील दोन बळी, यांनी बांगलादेशाच्या शिडातील आव्हान संपुष्टात आणले. अखेरच्या चेंडूपर्यंत तग धरलेले बांगलादेशाचे वारु अखेर भरकटलेच. अवघ्या 5 धावांनी त्यांचा पराभव झाला. या विजयामुळे भारताचे उपांत्य फेरीतले स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे.
महंमद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे दोन प्रदीर्घ अनुभव गाठीशी असणारे गोलंदाज असतानाही भारताच्या कप्तान रोहित शर्माने नवोदित गोलंदाज अर्षदीप सिंगवर विश्वास दाखविला. त्याने तो सार्थ ठरविलाही. 38 धावातील त्याचे 2 बळी त्याच्या तणावपूर्ण वातावरणातील केलेल्या उत्तम गोलंदाजीची साथ देत नाहीत. कारण अखेरच्या षटकात बांगलादेशाला 20 धावांची गरज असताना त्याच्या हातात चेंडू सोपविण्यात आला. दुसर्याच चेंडूवर टक्सीनने षटकार मारल्यानंतरही अर्षदीपने धीर सोडला नाही. त्याने नंतर मात्र चेंडू आपटला नाही. 2 यॉर्करनी बांगलादेशपासून विजय दूर नेला होता. पण नुरूल हसनच्या चौकाराने पुन्हा एकदा सामन्यात सनसनाटी निर्माण केली. अखेरच्या चेंडूवर त्याचा मोठा फटका लागला नाही आणि एकेरी धावेने बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आणले.
पावसामुळे निसरडे झालेले मैदान त्वरीत खेळण्यायोग्य परिस्थितीत आणणार्या स्थानिक क्रिकेट आयोजकांचे कौतुकच करायला हवे. पण ओलसर मैदानावर चेंडूचा पाण्यात सतत वावर असल्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होऊन बसले होते. त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी बांगलादेशाची दर्जेदार फलंदाजी कमी पडली हे देखील सत्य आहे. भारताला गोलंदाजीतील धार आणि यष्टीपाठचे क्षेत्ररक्षण पुढील वाटचालीसाठी सुधारावे लागले.