महिला अन् पुरुष दोन्ही सघांची बाजी
| बुडापेस्ट | वृत्तसंस्था |
भारताच्या दोन्ही पुरुष व महिला संघांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेतील आपले वर्चस्व गुरुवारीही कायम ठेवले आहे.
भारताच्या पुरुष संघाने आईसलँड संघाविरुद्ध 3-0 अशी विजयी आघाडी घेत महत्त्वाचे गुण मिळवले. तसेच महिला संघानेही झेक प्रजासत्ताकविरुद्ध 2.5 – 0.5 अशी महत्त्वपूर्ण विजयी आघाडी घेतली. भारताच्या पुरुष संघाकडून अर्जुन एरीगेसी, विदीत गुजराती व डी. गुकेश यांनी आईसलँडच्या खेळाडूंवर मात करताना उल्लेखनीय कामगिरी केली. अर्जुनने हॅनेस स्टेफानसन याला पराभूत केले. विदीतने हिलमीर हेमिसन याच्यावर विजय साकारला. गुकेशने विगनीर स्टेफानसन याचे आव्हान परतवून लावले.
महिला विभागात महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख हिने भारताला दमदार सुरुवात करून दिली. दिव्याने विजय मिळवल्यानंतर तानिया सचदेव हिला ड्रॉचा सामना करावा लागला. वंतिका अग्रवाल हिने विजय मिळवताना भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली.
दरम्यान, याआधी बुधवारी भारताच्या दोन्ही संघांनी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये धडाकेबाज सुरुवात केली. भारताच्या पुरुष संघाने मोरोक्को संघावर 4-0 असा सहज विजय साकारला, तर भारताच्या महिला संघाने जमैकावर 3.5 – 0.5 अशी मात केली. पुरुषांच्या विभागात भारताने पहिल्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. आर. प्रज्ञानंद याने तिसीर मोहम्मद याच्यावर विजय संपादन केला. अर्जुन इरीगेसी याने अलबिलीया जॅकेस याला पराभूत केले. विदीत गुजराथी याने ओखीर पियर याचे आव्हान परतवून लावले. हरिकृष्णा पी. याने मोयाद अनास याला पराभूत केले. भारताने मोरोक्कोला नमवले. पहिल्या फेरीत डी. गुकेशसह इतर स्टार खेळाडूंनीही न खेळण्याचा निर्णय घेतला. मॅग्नस कार्लसन, चीनचा डिंग लिरेन व अमेरिकेचा फॅबियानो कॅरुआना या खेळाडूंचा पहिल्या फेरीत सहभाग नव्हता.