भारतीय संघ प्रशिक्षकाविना आर्यलंड दौऱ्यावर

बुमराहला बसला मोठा धक्का

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजनंतर आयर्लंडचा दौरा करावा लागणार आहे. टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी टी-20 मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. पण आता या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाला मुख्य प्रशिक्षकाशिवाय जावे लागण्याची शक्यता आहे.भारतीय संघ एका वर्षानंतर पुन्हा आयर्लंडला जात असून पुन्हा टी-20 मालिका खेळणार आहे.

वरिष्ठ खेळाडूंशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांचे सपोर्ट स्टाफही या दौऱ्यावर जाणार नाहीत. अशा स्थितीत द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदी येईल, असे मानले जात होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आणि माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण या दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत जाणार नसल्याचे एका अहवालात सांगण्यात आले आहे. मागच्या वर्षीही जेव्हा टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर गेली होती तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत गेला होता. मात्र, यावेळी सितांशु कोटक आणि साईराज बहुतुले या दिग्गजांना कोचिंग स्टाफचा भाग बनवले जाऊ शकते.

Exit mobile version