भारतीय महिला क्रिकेटपटूंना आयसीसी संघात स्थान नाही

। दुबई । वृत्तसंस्था ।
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान लाभलेले नसून विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा समावेश होता.
मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा न्यूझीलंड येथे झालेली महिला विश्‍वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, सातपैकी चार सामने गमावणार्‍या भारताला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. भारताकडून उपकर्णधार हरमनप्रीत कौरने सात डावांमध्ये 318 धावा, तर डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाने 327 धावा केल्या. या दोघींनीही एक शतक आणि दोन अर्धशतकांची नोंद केली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये स्मृती आणि हरमनप्रीत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी होत्या. मात्र, या दोघींनाही आयसीसीफच्या सर्वोत्तम संघात स्थान मिळू शकले नाही.
विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मेग लॅनिग, यष्टीरक्षक-फलंदाज एलिसा हिली, रेचल हेन्स आणि बेथ मूनी या चार फलंदाज आयसीसीफ सर्वोत्तम संघात होत्या. उपांत्य आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी करणार्‍या हिलीची सलामीची साथीदार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्व्हार्दची निवड करण्यात आली. 22 वर्षीय वोल्व्हार्दने या विश्‍वचषकात सर्वाधिक पाच अर्धशतके झळकावली. तिच्या आफ्रिकन संघातील सहकारी मारिझेन कॅप आणि शबनिम इस्माइल यांनाही आयसीसीफच्या संघात स्थान लाभले. उपविजेत्या इंग्लंडची डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोन आणि अष्टपैलू नॅट स्किव्हरचाही या संघात समावेश होता.

Exit mobile version