। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
न्यूझीलंड महिला संघाने भारतीय महिला संघाविरुद्ध रविवारी (दि.27) झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह या मालिकेत न्यूझीलंडने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला होता. परंतु, दुसर्या सामन्यात न्यूझीलंडने पुनरागमन करत विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 260 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला 47.1 षटकात सर्वाबाद 183 धावाच करता आल्या. यावेळी भारताच्या राधा यादवने तिच्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते. परंतु, तिची झुंज अपयशी ठरली.
न्यूझीलंडने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीला खेळण्यासाठी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना उतरले होते. मात्र, पहिल्याच षटकात स्मृती मानधना शुन्यावर बाद झाली. त्यापाठोपाठ शफलीही 11 धावा करून बाद झाली, तर यास्तिकालाही ली ताहुहूने 12 धावांवर माघारी धाडले. यानंतर जेमिमा रोड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सोफी डिव्हाईनने या दोघींनाही बाद केलेे. हरमनप्रीतने 24 धावा केल्या, तर जेमिमाने 17 धावा केल्या. यानंतरही अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि तेजल हसबनीस यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्या देखील खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर बाद झाल्या. दोघींनाही प्रत्येकी 15 धावाच करता आल्या.
यानंतर अरुंधती रेड्डीही 2 धावांवर बाद झाली. शेवटी राधा यादवने अफलातून झुंज दिली. तिने सायमा ठाकोरसह 9 व्या बळीसाठी तब्बल 70 धावांची भागीदारी केली. परंतु, अखेर त्यांची ही भागीदारी 44 व्या षटकात जेस केरने मोडली. तिने सायमाला 29 धावांवर बाद केले. तसेच, राधा यादवची झुंज 48 व्या षटकात सोफी डिव्हाईनेच संपवली. राधाने 64 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तिच्या बळीसह भारताचा डावही संपला.