। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंग्लंडमधील बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचा सुवर्णपदकांचा सिलसिला अखेरच्या दिवशीही कायम राहिला.पी.व्ही. सिंधु पाठोपाठ बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनन पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 20 वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 57 पदकं जिंकली आहेत. ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे.
सिंधूचा सोनेरी स्पर्श
भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. या स्पर्धेतील भारताचे हे 19 वे सुवर्णपदक आहे. कॅनाडाची मिशेल ली आणि सिंधू यांच्यादरम्यान महिला एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात सिंधून मिशेल लीचा 21-15,21-13 अशा फरकाने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी, 2014 मध्ये ग्लासगो येथे आणि 2018मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते.
![](http://krushival.in/grygrars/2022/08/jpg.jpg)
सेनची कडवी झुंज
लक्ष्य सेनने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग याला मात देत विजय मिळवला आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत19-21, 21-9, 21-16 च्या फरकाने सामना जिंकला आहे. सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू अगदी अटीतटीची टक्कर देत होते. पहिल्या सेटमध्ये यॉन्गने केवळ दोन गुणांच्या फरकाने 19-21 ने सेट जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. पण दुसर्या सेटमध्ये लक्ष्यनं जबरदस्त पुनरागमन करत एकतर्फी विजय मिळवला. 21-9 अशा फरकाने लक्ष्यनं सेट जिंकत सामन्यात 1-1 ची आघाडी घेतली. ज्यानंतर अखेरचा निर्णयाक सेट कमालीचा चुरशीचा झाला. लक्ष्य आघाडीवर असतानाही यॉन्ग त्याचा पाठलाग करतच होता. पण अखेर यॉन्ग 16 गुणांवर असताना लक्ष्यनं 21 गुण पूर्ण करत सेट आणि सामना जिकंत सुवर्णपदकावर नाव कोरलं.