| बंगळुरू | वृत्तसंस्था |
न्यूझीलंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेच्या खुल्या व मास्टर्स गटाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने यूएईवर विजय मिळवत विजेतेपदला गवसणी घातली. तत्पूर्वी, शेवटच्या साखळी सामान्यांमध्ये यूएईने भारताला पराभवाचा धक्का देत न्यूझीलंड विरुध्द अंतिम फेरीत स्थान मिळवले. खुल्या गटात भारतीय संघ सुरुवातीपासून दुसर्या क्रमांकावर होता. पण, अंतिम टप्प्यात यूएईने दिलेल्या धक्क्याने भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध झालेला पराभवसुद्धा याला कारणीभूत ठरला.
खुल्या गटाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने यूएईवर 81-60 असा 21 धावांनी विजय साजरा केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या विक्टर डेवीस (17 धावा व 3 बळी), ब्राडेन गार्डनर (16 धावा), डॅर्रिन कुक व मॅट लँथम (प्रत्येकी 13 धावा व 1 बळी) यांच्या कामगिरीच्या जोरावर धमाकेदार विजय मिळवला व न्यूझीलंड-एशिया कपवर नाव कोरले.
मास्टर्स (40+) गटात न्यूझीलंडने यूएईचा 107-58 असा 49 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात न्यूझीलंडच्या एड्रियन फोंग (19 धावा व 2 बळी), ख्रिस प्रीस्ट (17 धावा व 2 बळी), रॉबर्ट हायंडमॅन (15 धावा व 2 बळी) व रॉब शेरी (19 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर यूएईचा खुर्दा केला. या स्पर्धेत खुल्या गटात न्यूझीलंडचा विक्टर डेवीस, तर मास्टर्स गटात यूएईचा खालिद हुसेन सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले.