अभिनेता अंकुश चौधरींची प्रमुख उपस्थिती; धावपटुंना मिळाला आगळावेगळा अनुभव
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल महानगर पालिकेच्यावतीने आरोग्य, फिटनेस आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने ‘खारघर हिल मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अंकुश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे मॅरेथॉनला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या मॅरेथॉनच्या माध्यमातून खारघरच्या निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाई आणि स्वच्छ हवेच्या सान्निध्यात धावण्याचा आगळावेगळा अनुभव धावपटूंना मिळाला. या स्पर्धेत 42 किमी फुल मॅरेथॉन, 21 किमी हाफ मॅरेथॉन, 10 किमी रन, 5 किमी रन आणि 3 किमी फन रन अशा विविध प्रकारांचा समावेश होता. यावेळी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच महिला आणि विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच, दिव्यांग बांधवांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांच्या सहभागाचे नागरिकांनी कौतुक केले. यावेळी अभिनेता अंकुश चौधरी यांच्या उपस्थितीमुळे युवा वर्ग आणि क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्य, फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि क्रीडा संस्कृतीचा संदेश देण्यात आला.
‘फिट पनवेल, हेल्दी पनवेल’
‘धावूया आरोग्यासाठी, धावूया फिटनेससाठी, धावूया पर्यावरणासाठी आणि धावूया पनवेलच्या अभिमानासाठी’ या संकल्पनेतून पनवेल महानगरपालिकेने ‘फिट पनवेल, हेल्दी पनवेल’चा संदेश दिला. यास्पर्धेच्यावेळी पनवेल महानगर पालिकेचे महापौर नितीन पाटील, सन्मानीय नगरसेवक, आयुक्त, सहआयुक्तांसह इतर मान्यवर उपस्थित होते.







