। मुंबई । वृत्तसंस्था।
भारताच्या प्रणव व्यंकटेश याने शुक्रवारी बुद्धिबळाच्या पटावर ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला. प्रणव व्यंकटेश व स्लोवेनियाचा मॅटिच लेवरेनसिच यांच्यामधील अखेरच्या फेरीचा सामना ड्रॉ राहिला. मोटेनेग्रो येथे ही स्पर्धा पार पडली. प्रणव व्यंकटेश याने मागील वर्षी चेन्नई आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकताना शानदार कामगिरी केली होती. ज्युनियर जागतिक स्पर्धेत त्याने आपले झंझावाती प्रदर्शन कायम ठेवले. या संपूर्ण स्पर्धेत त्याला एकाही लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले नाही.
प्रणव व्यंकटेश याने अकरापैकी सात सामन्यांमध्ये विजयाला गवसणी घातली. चार सामन्यांमध्ये त्याला ड्रॉचा सामना करावा लागला. त्याने या स्पर्धेमध्ये एकूण नऊ गुणांची कमाई करीत जेतेपदावर मोहर उमटवली. भारताच्या अरविंद चिंदमबरम याने प्राग मास्टर्स स्पर्धेच्या अजिंक्यपदावर हक्क सांगितला. त्यामुळे भारतीय संघासाठी आजचा दिवस दुहेरी यश मिळवणारा ठरला. प्रणव व्यंकटेश याची बुद्धिबळातील सुरुवात दमदार झाली होती. वेस्टब्रिज आनंद चेस अकादमीसाठी त्याची निवड झाली. आपल्या शिष्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केल्यानंतर स्वत: विश्वनाथन आनंद यांनी त्याचे अभिनंदन केले. पुरुष विभागात ज्युनियर विश्वविजेता होणारा प्रणव व्यंकटेश हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी विश्वनाथन आनंद यांनी 1987 मध्ये, पी. हरिकृष्णा याने 2004 मध्ये आणि अभिजित गुप्ता याने 2008 मध्ये देदीप्यमान कामगिरी केली होती.
त्यानंतर तब्बल 17 वर्षांनंतर प्रणव व्यंकटेशला संस्मरणीय कामगिरी करता आलेली आहे. महिला विभागात महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख हिने अहमदाबादमध्ये 2024 मध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर स्पर्धेत विश्वविजेती होण्याचा गौरव प्राप्त केला होता. त्याआधी डी. हरिका हिने 2008 मध्ये आणि कोनेरु हम्पी हिने 2001 मध्ये ज्युनियर विश्वविजेता होण्याचा स्वप्न पूर्ण केले होते.