। मुंबई । प्रतिनिधी ।
कोल्हापूर या मल्लांच्या भूमीत वाढलेल्या लेकीने सायकल विश्वात कोल्हापूर अन् महाराष्ट्राचं नाव अटकेपार पोहोचवलं आहे. घरात कुस्तीचं वातावरण अन् शेतकर्याची मुलगी पूजा दानोळे ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव गाजवण्याचं स्वप्न पाहात आहे. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडियामध्ये तिने पदकांची हॅटट्रिक साजरी केली. तिने 2020 च्या खेलो इंडियामध्ये 4 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळवली होती. 15 एप्रिलला 2004 रोजी जन्मलेल्या पूजासाठी हा प्रवास सोपा नव्हता, पण तिच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी आई-वडील खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहिले.
पूजा म्हणाली, मी आधी स्विंमिंग करायचे, माझे वडील कुस्ती खेळायचे. त्यामुळे घरात खेळाचं वातावरण होते. सायकलिंग करायचं असं काही मी ठरलं नव्हतं. एक दिवस शाळेतल्या शिक्षकांनी मला सायकलिंग करण्यास सांगतिले.त्यानंतर आम्ही एका स्पर्धेसाठी गेलो, तिथे मला पदक मिळालं. त्यानंतर मग मी तालुका, जिल्हास्तरीय अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाले. त्यावेळी मग ठरवलं की सायकलिंगमध्येच करियर करायचं. त्यानंतर दीपाली पाटील यांनी मला बालेवाडीत प्रवेश घेण्यासाठी बोलावलं. मी तिथे गेले आणि तिथून हा प्रवास सुरू झाला.
लोकांना जेव्हा आम्ही आमच्या सरावाबद्दल सांगतो, तेव्हा त्यांना विश्वास बसत नाही. आम्ही दिवसाला 100 ते 150 किमी सायकल चालवतो. आमच्या स्पर्धा असतात, त्यानुसार आम्ही तयारी करतो. मी रोड आणि ट्रॅक अशा दोन्ही प्रकारात स्पर्धा करते, तर भारतात बर्याचदा रस्त्यांवर ट्रॅफीक असतं. अशावेळी आम्ही रोड प्रकारासाठी पहाटे 5 वाजताच्या सुमारास सरावाला सुरुवात करतो.ट्रॅकसाठी जो सराव असतो, तो आम्ही संध्याकाळी 4 ते 6 किंवा 8 वाजेपर्यंत करतो. जेव्हा स्पर्धा असते, तेव्हा स्पर्धेच्या ठिकाणी 2-3 दिवस आधी जाऊन तेथील ट्रॅकशी जुळवून घेण्यासाठी सराव करतो. जशी स्पर्धा जवळ येते, तसा सराव अधिक करतो आणि जास्त फोकसने करतो. विशेष स्पर्धेच्या प्रकारानुसार करतो, असे पुजाने सांगितले. आमच्याकडे न्यूट्रिशन्स आहेत. ते आम्हाला जंक फूड न खाण्यास सांगतात. ज्या पदार्थांमुळे आमचा स्पीड कमी होईल, असे पदार्थ आम्ही टाळतो. सायकलिंगमध्येही दुखापतींचा धोका जरा जास्तच असतो.
पूजाने थोडक्यात माहिती दिली की, सायकलिंगच्या शालेय, तालुका, जिल्हास्तरीय अशा स्पर्धा होतात, त्यातून सायकलिंगची सुरुवात करू शकतो. जर सायकलिंगची सुरुवात करायची असेल, तर रोड प्रकारापासून करू शकतो. कारण आपले साधारण रोड असतात, त्यावर सराव करता येतो. रोड प्रकारात सायकलला ब्रेक आणि गिअरही असतो आणि या प्रकारात अंतर महत्त्वाचं असतं. या स्पर्धा लांब पल्ल्याच्या असतात. ट्रॅकमध्ये सायकलला ब्रेक नसतात आणि गिअरही नसतात. या प्रकारात कमी अंतराच्या स्पर्धा असतात, म्हणजे 4 ते 20 किमी. आणि या स्पर्धा खूप इंटेन्सिटीने होतात कारण त्यात स्पीड जास्त असतो. आर्थिक नियोजनाबद्दल सांगताना पूजा म्हणाली की, वडिलांनी कर्ज काढलेले आहे, त्यातून खर्च केला जातो. ती म्हणाली, आजपर्यंत मला सायकलिंगमध्ये स्पॉन्सर्स तर नाही मिळाले. पण मला प्रोत्साहन म्हणून मदत मिळाली आहे. अनेक हातात मदत करतात.