अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता
| पेण | प्रतिनिधी |
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याचा एकही मुद्दा विरोधक सोडत नाहीत. अशातच पेण भाजी मार्केटच्या चोरीस गेलेल्या रस्त्यासंदर्भात या अधिवेशनामध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेने विक्रम मिनिडोअर चालकांच्या थांब्याचा प्रश्न हाती घेतला आहे. हा प्रश्न हाताळत असताना त्यांच्या लक्षात आले आहे की, पेण येथील भाजी मार्केट तथा शॉपिंग मॉलचे बांधकाम फेब्रुवारी 2018 ला सुरू झाले. त्यावेळी या इमारतीचा आराखडा निश्चित करण्यात आला. त्यावेळी या शॉपिंग मॉलमध्ये जाण्यासाठी योग्यप्रकारे रस्त्यांची सोय केलेली होती. मात्र, जस जसे या इमारतीचे बांधकाम होण्यास सुरूवात झाली आणि या इमारतीच्या ठेकेदाराने मन मानेल तसे आपले बांधकाम सुरू केले. मूळ नकाशावर (प्लॅन) असलेल्या रस्त्यांची रुंदी अचानक कमी होण्यास सुरूवात झाली.
मूळ नकाशामध्ये इमारतीच्या सभोवताली तीन मीटरचा रस्ता असल्याचे दिसून येत आहे. तसेच मागच्या बाजूस गाडी फिरवता यावी म्हणून इमारतीच्या मागच्या बाजूस दोन्ही कोपर्यांवर रस्त्यांची रुंदी जास्त आहे. ती म्हणजे विक्रम स्टॅन्डच्या बाजूला 3.06 मीटर, तर सरकारी दवाखान्याच्या बाजूला 3.19 मीटर एवढी आहे. आता इमारत पूर्ण झाल्यावर विक्रम स्टॅन्डच्या बाजूने समोर साडेचार फूट, त्याच बाजूच्या मागच्या बाजूस अडीच फूट‘ तर राधिका हॉटेलच्या बाजूने संरक्षण भिंत घालणे गरजेचे होते. परंतु, ती न घातल्यामुळे समोर तीन मीटरचा रस्ता उपलब्ध होत आहे. मात्र, राधिका हॉटेलच्या बाजूने संरक्षण भिंत घातल्यास या रस्त्यांची रुंदी निश्चितच कमी होईल. तर बरोबर त्याच्या मागच्या साईटला सरकारी दवाखान्याच्या बाजूने 3.19 मीटर रस्त्यांची आवश्यकता होती. त्या ठिकाणीदेखील साडेचार फूट रुंदीचा रस्ता आहे. ज्या वेळेला भाजी मार्केट तथा शॉपिंग मॉल बांधण्याचे ठरले, त्यावेळेला या इमारतीच्या सभोवताली (फळभाज्या) माल घेऊन येणार्या गाड्या फिरवता येतील अशा विचाराने या इमारतीची डिझाईन केली होती. परंतु, ज्या वेळेला इमारत पूर्ण झाली, त्या वेळेला मात्र आराखड्यात दिसणारे रस्ते गायब झाल्याचे निदर्शनास आले आहेत. याच मुद्द्याची सखोल चौकशी करून चालू अधिवेशनात भाजी मार्केटचा चोरीस गेलेल्या रस्त्याविषयीचा मुद्दा चर्चेला घ्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या अधिवेशनात पेण भाजी मार्केटचा प्रश्न गाजण्याची शक्यता नाकारता येणार नाही.