हेटवणे धरणावर 11 मार्चला आंदोलनाचा इशारा
| खरोशी | वार्ताहर |
गेले कित्येक वर्षे सातत्याने पिण्यासाठी व शेती सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा व आंदोलन करून सुद्धा पेण तालुक्यातील खारेपाट भागाला पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. याविरोधात खारेपाटातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, आक्रमक ग्रामस्थ व महिला हेटवणे धरणावर हंडा घेऊन 11 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून पाणी भरण्यासाठी जाणार आहेत, अशा इशारा दिला आहे.
खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी येथे आमरण उपोषण सुरू केले होते तेव्हा शेती च्या सिंचनासाठी 766 मंजूर केले. या कामाचे हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा मंजुरीनंतर 15 ऑक्टोबर 2024 रोजी सदर कामाचे टेंडर उघडण्यात येऊनही कार्यारंभ आदेश न झाल्याने सदर मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि तीन दिवसांनी अनियमित होणार्या पाणीपुरवठा याबाबत जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
येथील शेतकरी अहिंसेच्या आणी संविधानीक मार्गाने आपल्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत राहिले; परंतु इतक्या शेवटच्या टप्प्यात असून 15 ऑक्टोबर 2024 रोजी निविदा उघडण्यात येऊनही अजून कार्यारंभ आदेश न दिल्याने काम सुरू झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 11 मार्च रोजी सकाळी 9.30 पासून हेटवणे धरणातून महीला व शेतकरी हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी जाणार आहेत. यामुळे तीन दिवसाआड येणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे. पुन्हा एकदा अधिवेशन काळात हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन नाईलाजाने करावे लागत आहे, असे निवेदन पेण तहसीलदारांना दिले आहे.
पेण वाशी खारेपाट भागात पाणीटंचाई पाचवीला पुजली आहे. कित्येक वर्षे येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हेटवणे धरणातील पाणी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आमच्या खारेपाटात पोहोचत नाही, यामुळे आमच्या महिलांनी व नागरिकांनी आपणच धरणावर जाऊन पाणी भरुन आणूया असा निर्णय घेतला आहे.
प्रकाश माळी,
अध्यक्ष, खारेपाट विकास संघटना