| उरण | वार्ताहर |
भारत पेट्रोलियमचे घरगुती गॅस सिलिंडर हे द्रोणागिरी नोडमध्ये रस्त्याच्या आडमार्गाला अदलाबदल करीत होते. याबाबत कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत. यावरून यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जातो. याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
घरगुती गॅस सिीडिरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून त्याची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने शासनाने घरगुती गॅस सिलिंडर देताना वजन करून देणे सक्तीचे असतानाही उरणमधील गॅस सिलिंडर विक्रेते वजन न करता घरपोच सिलिंडर दिले जात आहेत.
भारत पेट्रोलियम गॅस सिलिंडरच्या बाबत अशा तक्रारी जास्त आहेत. या कंपनीचे कर्मचारी ग्राहकांशी उर्मट वर्तन करीत असल्याने नाराजीचा सूर निघत आहे. यापूर्वीही करंजा परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये हेराफेरी केल्याच्या तक्रारी होत्या. परंतु, आज मंगळवार, दि. 4 मार्च रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान द्रोणागिरी नोडमधील वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी एका मोठ्या ट्रकमधून शकुंतला गॅस सर्व्हिसच्या छोट्या गाड्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची अदलाबदल केली जात होती. यावेळी कोणीही पहाण्यास नसल्याने काही भरलेल्या सिलिंडरमधून गॅस कमी करून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत चौकशी केली असता कर्मचारी बोलत नव्हते.
यामागे गौडबंगाल नसते तर घरगुती गॅस सिलिंडर हे आडमार्गाला खाली करण्याऐवजी मुख्य रस्त्यावर करू शकले असते. आसपासचे शेजारीही आडमार्गालाच घरगुती सिलिंडरची अदलाबदल केली जात आहे, याला दुजोरा देत आहेत. याबाबत अधिकारीवर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.