| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील फणसाड धरण परिसरातील शेतकर्यांना धरणातून दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतीसाठी मिळणारे पाणी जानेवारी महिना उजाडला तरी अद्यापही मिळत नसल्याने शेत-बागायतीचे नुकसान होत असून, शेतकर्यांच्या पाणीप्रश्नी वरिष्ठ अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाच्या फणसाड धरण लघुपाटबंधारे विभागातर्फे भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील काजुवाडी-बेलवाडी येथील फणसाड धरण चौकी येथे कोकण हंगाम सन 2021-22 करिता पाणी सिंचन व्यवस्थापन व कालव्यास पाणी सिंचनासाठी मिळण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन (बोर्ली), प्रशांत मिसाळ (कोर्लई), काशिनाथ वाघमारे (भोईघर), भोईघर माजी सरपंच/प्रवर्तक मनोहर महाडिक, फणसाड धरण लघुपाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी कनिष्ठ अभियंता नि.म. मोरे, प्रसाद चौलकर यांसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. परिसरातील सिंचनाखाली येणार्या मुख्य कालव्याला बंदिस्त पाइपलाइन टाकणे, महादेवाची चाळ तीन कि.मी. शेतचरी दुरुस्ती करणे, मुख्य कॅनालमधून सिंचनाकरिता दरवर्षी 1 डिसेंबरपासून बागायतीला पाणी मिळणे आदी प्रमुख विषयांवर बैठकीत चर्चा व विचार विनिमय करण्यात आला. याकरिता 1 ऑक्टोबरपासून महिन्यासाठी दररोज 15 कामगार (लेबर)ची तरतूद करण्यात यावी, यावर भर देण्यात आला. याची वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन दरवर्षी एक डिसेंबरपासून बागायतीला पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.शेतकर्यांच्या पाणीप्रश्नी आयोजित बैठकीला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.







