पोलिसांनी घेतले ताब्यात; वाहन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे पार्कींग केलेल्या एका चारचाकी वाहनाला जाळण्याच्या उद्देशाने टायरला आग लावण्यात आली. यामध्ये गाडीचे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही बाब सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी नैनेश किरण गायकवाड यांच्या विरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चोंढी येथील वाहन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील 10/12 वर्षांत अनेक वाहनांना आग लावल्याचा प्रकार घडला असल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या आगोदर गाड्यांना आग लावणारी हीच ती व्यक्ती आहे का? याची सखोल चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे, झालेल्या आगीच्या घटनेमुळे चोंढी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नैनेश किरण गायकवाड असे गाडीच्या टायरला आग लावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. चोंढी येथील वासूदेव आमले यांनी चोंढी येथे एका गाळ्याच्या समोरील शेडमध्ये 29 ऑगस्ट रोजी त्यांची कार पार्कींग करून ठेवली होती. मात्र, टायरमधील हवा कमी झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी कॉम्प्रेसरच्या मदतीने हवा भरण्यासाठी ते गाडीजवळ गेले. त्यावेळी गाडीचा पुढचा टायर जाळलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर सीसीटीव्ही द्वारे पाहणी केल्यानंतर गावातील नैनेश किरण गायकवाड हा त्या गाडीच्या जवळपास असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून आले. त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. मात्र, आगीच्या या घटने नंतर चोंढी परिसरात वाहन सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नैनेश गायकवाड हा वादग्रस्त व्यक्ती असल्याचा आरोप चोंढी येथील ग्रामस्थांनी केला असून, त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.






