। मुंबई । प्रतिनिधी ।
हुकूमशाही व मनमानी कारभार, नोकरकपात, बंद करण्यात आलेले विविध सरकारी विभाग, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अर्थव्यवस्थेची घसरण अशा अनेक मुद्द्यांवरून अमेरिकेत प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. अमेरिकेची जनता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली असून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे स्वातंत्र्य लढ्यात जसे दिसले तसे आता अमेरिकेत दिसत आहे, असे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, अमेरिकेतील 50 राज्यामधील जनता डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क म्हणजे तिकडले अदानी यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. कुणाला वाटत असेल की जे अमेरिकेत घडले ते हिंदुस्थानात घडणार नाही. परंतु, अशा प्रकारचा स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केली आहे आणि ते होणार. अमेरिका जशी मस्कला विकली जात आहे, तसा हा देश मोदी, शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जात आहे. वक्फ सुधारणा विधेयक ही त्याची एक पायरी आहे. सर्वकाही अदानीच्या घशात जात आहे, हे स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेप्रमाणे देशातील राज्याराज्यातील लोक रस्त्यावर उतरून क्रांतीचा झेंडा फडाकावल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.