गोदरेज-टाटा व्यवस्थापनाविरोधात सुधाकर घारेंचा एल्गार; स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराचा हक्क देण्याची मागणी
| खोपोली | प्रतिनिधी |
रायगडमध्ये मोठमोठे औद्योगिक प्रकल्प उभे राहत असताना स्थानिक तरुण-तरुणींना मात्र रोजगारासाठी वणवण करावी लागत असल्याची विसंगती पुन्हा ऐरणीवर आली आहे. उद्योगांसाठी स्थानिकांच्या जमिनी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असेल, तर त्याचा पहिला लाभ स्थानिकांना रोजगाराच्या रूपाने मिळायला हवा, अशी मागणी जोर धरत आहे. याच मुद्द्यावर सुधाकर घारे यांनी आक्रमक भूमिका घेत गोदरेज आणि टाटा व्यवस्थापनाला जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.
रायगडच्या औद्योगिक पट्ट्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या उद्योगांचा विस्तार झाला आहे. अनेक प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या जमिनी संपादित झाल्या, तर परिसरातील पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक संसाधनांचा उद्योगांसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे या औद्योगिक विकासाचा स्थानिक नागरिकांना नेमका किती फायदा झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षण पूर्ण करून पदवी हातात घेतलेल्या स्थानिक तरुण-तरुणींसमोर रोजगाराचे संकट कायम आहे. कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज, मुलाखती आणि रोजगार मेळाव्यांची धावपळ करूनही अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे उद्योग रायगडमध्ये, मग रोजगारासाठी आमच्या मुलांनी दुसऱ्या शहराची वाट का धरावी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
औद्योगिक प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या जमिनी घेतल्या जात असतील, तर त्या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. कंपन्यांनी स्थानिकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण आखावे, कौशल्य प्रशिक्षण द्यावे आणि पात्र स्थानिक उमेदवारांना संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. या प्रश्नात स्थानिक तरुणींच्या रोजगाराचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक तरुणींना सुरक्षित आणि जवळच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना रोजगारापासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांनी महिलांसाठी सुरक्षित, कौशल्याधारित आणि दीर्घकालीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची मागणीही पुढे येत आहे.
उद्योगांना विरोध नाही; मात्र उद्योगांच्या विकासाचा लाभ स्थानिकांना मिळायलाच हवा, अशी भूमिका घारे यांनी मांडली. स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग उभे राहत असतील, तर स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. संबंधित व्यवस्थापनांनी हा प्रश्न गांभीर्याने सोडवला नाही, तर त्यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रायगडच्या औद्योगिक विकासाचे मूल्यमापन करताना केवळ गुंतवणूक, उत्पादन आणि उद्योगांची संख्या न पाहता ङ्गया उद्योगांमधून स्थानिकांना किती रोजगार मिळाला?फ हा प्रश्नही विचारला गेला पाहिजे. उद्योगांच्या विस्तारासोबत स्थानिकांच्या रोजगाराच्या अपेक्षाही पूर्ण होणार का, याकडे आता रायगडमधील तरुणांचे लक्ष लागले आहे.
