नेरळच्या राजमाता जिजामाता तलावाची बदनामी

ज्येष्ठांपेक्षा प्रेमीयुगुलांना होतोय विरुंगळा; कडक नियमावलीची मागणी


| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावामध्ये राजमाता जिजामाता तलाव हे सर्वांसाठी पर्यटनाचे आणि सायंकाळ व्यतित करण्याचे एकमेव ठिकाण आहे. मात्र सकाळ आणि सायंकाळ वगळता अन्य वेळी त्या परिसरात प्रेमीयुगल आणि आंबटशौकीन यांची गर्दी वाढू लागली आहे. तेथे येणार्‍या व्यक्तींवर नेरळ ग्रामपंचायतचे कोणत्याही स्वरूपातील बंधन नसल्याने नेरळ मधील राजमाता जिजामाता तलाव बदनाम होऊ लागला असून, तेथे नवीन नियमावली बनविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सात एकरात असलेल्या या तलावाच्या चोहोबाजूंनी जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला असून, त्या ठिकाणी ओपन जिम आणि बसण्यासाठी बाकडे अशी सर्व व्यवस्था आहे. सकाळी अगदी पहाटे पाच वाजल्यापासून त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात नेरळकर येत असतात. त्यानंतर सायंकाळ साडे चार पासून रात्री आठ पर्यंत देखील शेकडो नेरळकर चालण्यासाठी येत असतात. त्या ठिकाणी येणार्‍या जेष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र कट्टा बनविण्यात आला असून, किमान 40 बाकडे या तलावाच्या परिसरात असल्याने जेष्ठ व्यक्ती आणि महिला यांची वर्दळ राजमाता जिजामाता तलाव परिसरात असते.

मात्र सकाळी दहापासून सायंकाळी चारपर्यंत या तलावाच्या बकड्यांवर कॉलेज तरुण तरुणी यांची गर्दी असते. त्याचवेळी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघालेले स्कुल आणि कॉलेज युनिफॉर्म मध्ये असलेले विद्यार्थी आपल्या वह्या पुर्स्तके यांच्या बॅगांसह तेथे पोहचलेले दिसून येत असतात. दुपारी बारापासून प्रामुख्याने आंबट शौकीन यांनी बाकडे अडविलेले असतात. त्यांच्या गोंगाट दुपारच्या वेळी राजमाता जिजामाता तलाव परिसरात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यात झाडाखाली घोळक्याने बसलेले आंबट शौकीन यांच्यामध्ये होणारे अश्‍लिल संभाषण सुरु असल्याची तक्रार देखील काही स्थानिकांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे केल्या आहेत. त्यामुळे सकाळी दहा ते चार या वेळेत राजमाता जिजामाता तलाव सर्वनसाठी बंद ठेवण्यात यावा आणि चार वाजल्यानंतर गेट उघडून रात्री नऊ वाजता बंद करण्यात यावा, अशी सूचना ग्रामपंचायत सदस्य राजन लोभी हे स्वतः करणार आहेत.

राजमाता जिजामाता यांच्या नावाने उभारलेल्या वास्तुचे पावित्र्य जपण्याची गरज आहे. त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी आपले आरोग्य जपण्यासाठी नेरळकर त्या परिसराचा वापर करीत असतात. मात्र दुपारच्या वेळी त्या ठिकाणी सुरु असलेले प्रकार निश्‍चित लज्जास्पद असून त्या सर्व प्रकारांना ग्रामपंचायतीने आळा घालण्याची गरज आहे. त्यासाठी सकाळी दहा नंतर तलाव परिसर सर्वनसाठी बंद ठेवण्यात यावा आणि संध्याकाळी उघडावा अशी सूचना केली आहे. शिवाय त्या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.

नितीन कांदळगावकर
स्थानिक रहिवाशी

तलाव परिसरात असलेली ओपन जिम खास महिला भगिनी यांच्यासाठी असावे अशी आपण ग्रामसभेत मागणी केली आहे. त्याची कार्यवाही व्हावी आणि पुरुषांसाठी गेटवर किंवा जेष्ठ नागरिक कट्टा भागात ओपन जिम उभारावी जेणेकरून महिला भगिनी यांना तेथे व्यायाम करतं असुरक्षित वाटणार नाही.

बंडू क्षीरसागर
नेरळ शहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे)
Exit mobile version