खेडमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव

। खेड । वार्ताहर ।
खेड-भरणे मार्गावर मोकाट जनावरांच्या वावराने वाहनचालकांसह पादचारी हैराण झालेले असतानाच शहरातील बाजारपेठेमध्येही त्यांनी बस्तान मांडले आहे. यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे. तरीही मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी नगरपरिषद प्रशासनास सवड मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. खेड-भरणे मार्गावर मोकाट जनावरामुळे वाहतूक कोंडी होत आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाईसाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने याचा त्रास वाहनचालकांसह पादचार्‍यांना होत आहे. तरीही संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी प्रशासन पुढाकार घेत नसल्याने जनावरांच्या मालकांचे फावत चालले आहे. मोकाट जनावरे मार्गात आडवी येत असल्याने अपघातही घडत आहेत. आता मोकाट जनावरांनी आपला मोर्चा बाजारपेठेकडे वळवला आहे. मोकाट जनावरे दुकानांसमोरच बस्तान ठोकत असल्याने सर्वत्र पसरणारी दुर्गंधी त्रासदायक ठरत आहे. नगरपरिषद प्रशासनाने काही महिन्यापूर्वी मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र याचा नगरपरिषद प्रशासनाला विसर पडला आहे.

Exit mobile version