गावोगावी वाड्यावस्त्यांवर नागरिकांची तपासणी
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन उपक्रमांना मंगळवार (दि.13) पासून सुधागड तालुक्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील गावोगावी, वाड्या, वस्त्यांवर जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच याबाबत जनजागृती देखील केली जात आहे. या उपक्रमात संपूर्ण तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.
कुष्ठरोग ही एक बर्याच वर्षापासून चालत आलेली मानवी समस्या आहे. या रोगाचे रोगजंतू मानवी मज्जातंतूमध्ये वाढत असल्याने रुग्णांस येणारी विद्रुपता व व्यंगत्वामुळे कुष्ठरोग एक लांच्छन असल्याचा समाजातील कित्येकांचा समज होता व अजूनही आहे. मात्र आज बहुविध औषधोपचारामुळे कुष्ठरुग्णाची काही लाखांत असलेली संख्या आता काही हजारात आली आहे. तो दिवस दूर नाही ज्याप्रमाणे देवी रोगासारखा कुष्ठरोग हा सुध्दा इतिहास जमा होईल. यासाठी लोकांनी स्वतःहुन तपासणीसाठी पुढे येऊन त्वरीत औषोधोपचार चालु केल्यास हे साध्य होईल. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका गावोगावी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. त्यांना सहकार्य करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आव्हान जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे यांनी केले आहे.