अलिबागच्या शिक्षकांचा पुढाकार

मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राबविली वक्तृत्व स्पर्धा

| अलिबाग | प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अलिबागच्या शिक्षकांनी वक्तृत्व स्पर्धा राबवून पुढाकार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा अलिबागच्या संकल्पनेतून हा उपक्रम शनिवारी राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये तालुक्यातील 15 केंद्रांतून 90 विद्यार्थी या सहभागी झाले. रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त स्पर्धेच्या युगात टिकून ठेवण्यासाठी शिक्षक प्रमोद भोपी यांनी पुढाकार घेत अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या उपक्रमाला तालुक्यातील शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. मराठीसह इंग्रजी माध्यमातून घेण्यात आलेली ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण केले. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी अलिबाग पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद भोपी, विनोद कवळे, सुनील पाटील, अजित हरवडे, निलेश वारगे, नित्यनाथ म्हात्रे, विनायक भोनकर, उमेश ठाकूर आदी शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेचे औचित्य साधून प्रियांका पिंगळा हिचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील या मुलीने व्यावसायिक शिक्षणात भरारी घेऊन इंजिनिअरची पदवी मिळवल्याने तिचा या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षक विलास पाटील यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Exit mobile version