| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत येथून इनोव्हा गाडी चोरून नेणाऱ्या चोरट्यांना कर्जत पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. कर्जत पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्जत येथील सद्दाम अश्फाक मिस्त्री यांचे दहीवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात स्पेअर पार्ट शोरुम आहे. त्यांनी त्यांच्या शोरुमच्या शेजारी टोयाटो कंपनीची पांढऱ्या रंगाची इनाव्हा गाडी उभी करून ठेवली होती. ती गाडी 21 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, कर्जतचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहूल गायकवाड, पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे, सुशांत वरक आणि कर्जतचे गुन्हे प्रगटीकरण पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. या पथकाला तांत्रिक तपासाच्या मदतीने चोरट्यांबाबत खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली. त्या माहितीच्या आधारे तपास पथक वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने राजस्थान येथे रवाना केले.
तपास पथकाने राजस्थान येथील बाडनेर व जालौर जिल्ह्यांमधून या गुन्ह्यातील ओम प्रकाश सवाई राम विश्नोई (34) व अशोक कुमार ईसराराम बिश्नोई (47) या दोन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरी केलेली इनोव्हा गाडी आणि आरोपीतांनी गुन्हा करण्याकरिता वापरलेली एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपीत हे अतिशय सराईत आणि कुख्यात आरोपीत असून त्यांच्याविरुध्द राजस्थान राज्यात 3 खूनाचा प्रयत्न याच्यासह एकूण 17 चोरी, फसवणूक, बनावट कागदपत्रं, खंडणी, गंभीर दुखापत, बलात्कार व भारतीय हत्यार कायदा, अंमलीपदार्थ विरोधी कायदा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
इनोव्हा गाडी चोरणाऱ्यांना राजस्थानमधून अटक
