तरंगणाऱ्या मत्स्यखाद्याची निर्मिती
| खरोशी | प्रतिनिधी |
पेण खारेपाट हा तलावांमधील मत्स्यशेतीसाठी प्रसिद्ध असलेला भाग असून, येथे मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन केले जाते. मात्र, मत्स्यखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे स्थानिक मत्स्यशेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर खारेपाटातील तरुण सूर्यकांत नारायण पाटील यांनी पुढाकार घेत तरंगणारे मत्स्यखाद्य तयार करणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू केले आहे.
दररोज सुमारे दीड ते दोन टन क्षमतेचे मत्स्यखाद्य तयार करणाऱ्या या प्रकल्पामुळे मत्स्यशेती क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाहेरील महागड्या कंपनींच्या खाद्यावर अवलंबित्व कमी होऊन स्थानिक स्तरावर किफायतशीर आणि दर्जेदार खाद्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन मत्स्यशेती अधिक नफ्याची ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा उपक्रम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण खारेपाटातील मत्स्यशेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. ग्रामीण भागात उद्योग उभारणीसाठी आवश्यक धैर्य, नियोजन आणि तांत्रिक दृष्टिकोन यांचा उत्तम संगम या प्रकल्पातून दिसून येतो. यामुळे कृषीपूरक व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
या उद्योगाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, सहायक कृषी अधिकारी सतीश गायकवाड, कृषी सहायक अनंत पाटील, माजी सरपंच श्रीकांत पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी प्रमोद पाटील, माजी पंचायत सदस्य नंदकुमार पाटील तसेच मोठ्या संख्येने मत्स्यशेतकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत स्थानिक स्तरावर अशा उद्योगांची आवश्यकता अधोरेखित केली.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत चंद्रकांत नारायण पाटील यांनी ‘जगदंबा फिश फीड’ या नावाने हा उद्योग सुरू केला आहे. स्थानिक मत्स्यशेतकऱ्यांना कमी दरात उच्च दर्जाचे मत्स्यखाद्य उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरत असून, भविष्यात इतर भागांसाठीही हा आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
