पावसमध्ये आढळला शिलालेख!

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील पावस येथील श्री विश्‍वेश्‍वर मंदिराच्या दीपमाळेजवळ मंदिर जीर्णोद्धाराविषयीचा शिलालेख सापडला आहे. सन 1725 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याबाबत यात उल्लेख आहे. हा शिलालेख पुण्यातील इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी वाचला असून, त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.
श्री विश्‍वेश्‍वर व श्री सोमेश्‍वर या दोन्ही मंदिरांची बांधणी सारखी आहे. काष्ठशिल्पे, दिशा, रचना यात साम्य असल्याने या मंदिरांचे जीर्णोद्धार एकाचवेळी झाले असावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळच विश्‍वेश्‍वराचे मंदिर आहे. विश्‍वेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी-पोतदार यांनी केला, असा शिलालेखावर उल्लेख आहे.
सचित्र पावस दर्शन पुस्तकात शिलालेखाचा फोटो दिला आहे; पण त्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्यावेळी शिलालेख पाहिला, तो वाचता येत नव्हता. तो अभ्यास करून वाचला. अनेक ठिकाणी मंदिर परिसरात शिलालेख वाईट पद्धतीने पडलेले असतात. द्वारशिल्प व त्यातील महत्त्वाचे भाग रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. दरम्यान, श्री. तेंडुलकर यांच्या ‘मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्‍वात’ या पुस्तकात 359 शिलालेखांचा समावेश आहे. यात रत्नागिरीचे 7 शिलालेख आहेत. मराठा सरदारांनी केलेल्या बांधकामाची माहिती पोहोचवण्यासाठी अभ्यासाची गरज तेंडुलकर यांनी व्यक्त केली.

शिलालेख काय?
शके 1647 विश्‍वावसू नाम संवत्सरे, यावर्षी विश्‍वेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी पोतदार यांनी केला, असा सात ओळीतील मजकूर या शिलालेखावर कोरला आहे. सोमेश्‍वराचा शिलालेख उपलब्ध नाहीये. त्या अर्थी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार इ. स. 1725 ला केलेला असावा, हे स्पष्ट होत आहे. कोकणातल्या मंदिरांच्या दृष्टीने हा इतिहास महत्त्वाचा आहे.

ऐतिहासिक ठेवा गमावतो आहोत
तेंडुलकर यांना यापूर्वी शंकरेश्‍वर मंदिर, लांजाला संघ नाथेश्‍वर मंदिरात शिलालेख आढळले. त्याचे वाचन त्यांनी केले. तसेच, धूतपापेश्‍वर मंदिरात द्वारपालाच्या डावीकडे मागे संस्कृतमधील शिलालेख सापडल्याचे सांगितले. जिल्ह्यात विविध ठिकाणी असे शिलालेख आहेत. त्यांचा आणखी शोध घ्यावा लागेल. साफसफाई करावी लागेल. त्यातून बरीच माहिती मिळू शकते. शिलालेख हे समकालीन व अस्सल विश्‍वसनीय पुरावे आहेत; परंतु ते सार्वजनिक ठिकाणी असल्याने दुर्लक्ष होत असून आपण ऐतिहासिक ठेवा गमावतो आहोत. हा ठेवा संरक्षित व्हावा, अशी भूमिका तेंडुलकर यांनी मांडली.

Exit mobile version