निवडणूक निरीक्षकांकडून केंद्रांची पाहणी

| अलिबाग | वार्ताहर |

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघ 192 च्या निवडणूक निरीक्षक (सामान्य) रुही खान यांनी मतदारसंघातील प्रमुख मतदान केंद्रे आणि निवडणूक संबंधित यंत्रणांना बुधवारी (दि. 6) भेट दिली. यावेळी केंद्रांची पाहणी करुन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणे आणि सर्व व्यवस्था भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात, याची खात्री करणे, हा या भेटीचा उद्देश होता.

निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून निश्‍चित करण्यात आलेल्या सर्व शाळा, महाविद्यालय यांना त्यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारांसाठी उपलब्ध पायाभूत सोयी आणि सुविधांचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे व्यवस्था केली असल्याची खात्री करून घेतली. विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी सुलभ व्यवस्थापन याची पाहणी केली. मतदान प्रक्रियेदरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी मतदारांसाठी सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचार्‍यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील ज्या मतदान केंद्रावर 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, त्या बीएलओला विशेष सन्मानित करण्यात येईल, असे रुही खान यांनी यावेळी जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी सर्व अधिकार्‍यांनी निःपक्षपाती आणि सतर्क राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version