दरड ग्रस्त भागाची पाहणी

। नेरळ । वार्ताहर ।

शिवसेना ठाकरे गटाचे उप जिल्ह्या प्रमुख नितीन सावंत यांनी प्रशासन अधिकार्‍यांसोबत दरडग्रस्त भागाची पाहणी केली आहे. गेल्या वर्षी कर्जत तालुक्याला लागून असणार्‍या खालापूर तालुक्यात इर्शालवाडीत दरड कोसळून शेकडो नागरिकांचे जीव गेले होते. दरम्यान, प्रशासनाला एखाद्या दुर्घटननेनंतर जाग येत असल्याने येणारा मान्सून डोळ्यासमोर ठेवून नितीन सावंत यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

कर्जत तालुक्यात येत असलेल्या पळसदरी ठाकूर वाडी येथे दरड कोसळण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात होती. याबाबत नितीन सावंत यांना माहिती देण्यात आली होती. यावेळी सावंत यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रथम लक्षात घेता निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत या प्रशासन अधिकार्‍यांना सोबत घेवून पळसदरी ठाकूर वाडी येथे भेट दिली. सावंत यांच्या सोबत यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते संदीप सुर्वे, शाखाप्रमुख अभिजित दरेकर, उप शाखाप्रमुख प्रतिक सुर्वे आणि ठाकूर वाडी येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ सोबत होते.

Exit mobile version