रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील वाँटेड तसेच फरारी आरोपींचा शोध घेत असताना पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार खोपोली पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यामधील वॉटेंड आरोपी अनिल श्यामवेल गायकवाड हा फरार झाला असून तो सध्या त्याच्या दौंड-पुणे येथील घरी राहण्यास गेला आहे. त्याप्रमाणे तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याचे ठाव ठिकाणाबाबत इत्यंभूत माहिती प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक श्री.अमोल वळसंग व पथक दौंड येथे रवाना झाले. सदर ठिकाणी दौंड पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे व त्यांच्या कर्मचार्यांच्या मदतीने अनिल श्यामवेल गायकवाड याला अत्यंत शिताफीने पकडले.
अनिल गायकवाड याचा पूर्व इतिहास पडताळला असता सदर आरोपी आंतरराज्य स्तरावर चोरी व फसवणुकीचे गुन्हे करीत असून त्याचेवर ठाणे शहर, पुणे शहर, बँगलोर, कर्नाटक येथे एकूण 23 गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. या आरोपीवर शाहूपुरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर, तळोजा पो. ठाणे, खारघर पो. ठाणे, भिवंडी शहर, विनोबा भावे पो. ठाणे मुंबई , वाशी या पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये हवा होता. तसेच त्याने चेंबूर, भांडूप, सायन, तसेच चेन्नई याठिकाणी सुद्धा गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपी शोध पथकाने आज पर्यंत जवळपास 40 आरोपींचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक स्वप्नील गुंजाळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड-अलिबाग पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिजे/फरारी आरोपी शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस शिपाई दिपक जाधव, किरण देवकते यांनी सायबर सेलचे पोलिस शिपाई अक्षय पाटील व तुषार घरत यांच्या तांत्रिक मदतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.