राज्य क्रीडा विभागाबरोबर सामंजस्य करार
| मुंबई | प्रतिनिधी |
कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. येथे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील 12.76 हेक्टर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व संबंधित क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हस्तांतरित करण्यात आली.
