पर्यटन विभागाचा पुढाकार; रोजगारनिर्मिती, अर्थव्यवस्थेला चालना
मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते. परिवहन मंत्री अॅड अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
यावेळी एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेले पर्यटक निवास आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
विविध संस्थांशी करार
त्याचबरोबर एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकींग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकींग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरुन कोठुनही बूक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हींग साहसी क्रीडा प्रकार सुरु करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचार्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही आज सामंजस्य करार करण्यात आला.
राज्याचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे. राज्यातील पर्यटन वैभव जगभरासमोर खुले करण्यासाठी यापुढील काळातही पर्यटन विभागाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यात येईल.
उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री
तीन हजार कोटींचे करार
पर्यटनवाढीला चालना देण्याची गरज आहे. राज्याच्या पर्यटनवाढीसाठी आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पर्यटन विभागाला अधिकचा निधी देण्याची सरकारची तयारी आहे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार आपण केले. या सामंजस्य करारामुळे राज्यातील पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार आहे,असे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब थोरात,उदय सामंत, आदित्य ठाकरे, रे आदीनी मनोगत व्यक्त केले.
सुंदर कोकण जगासमोर आणूया – तटकरे
पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, कोकणाचा पर्यटनासह इतर सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाने कोकणासारखे होण्याबाबत बोलले पाहीजे, अशा पद्धतीने कोकणाचा विकास करु. सध्या कोरोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन क्षेत्राला आज सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.