वाहनांची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील 11 मोठी वाहने तर एक पल्सर मोटार सायकल अशी 30 लाख 12 हजार रुपये किंमतीची वाहने चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केली आहे. यातील तीन आरोपींविरोधात 12 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.मारूती तेऊरवाडकर, अक्षक पवार, करीम शरीफ मोहीद्दीन शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 17 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी जेवताना येथील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एच.पी. पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवरून एक 1110 मॉडेलचा आयशर टेम्पो चोरीस गेला असल्याची फिर्याद महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून चोरांना चाप बसावा, यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कसून तपास करण्यास सुरुवात केली होती. अलिकडील काळात रायगड जिल्ह्यामध्ये तसेच आजूबाजूचे जिल्ह्यांमध्ये चारचाकी वाहन चोरीचे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहीती समोर आली होती.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तीन वेगवेगळी तपास पथके तात्काळ तयार करून गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या घटनेचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार अमोल हंबीर यांना गोपनीय बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक येथील असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोसई विकास चव्हाण व त्यांच्या तपास पथकाने अमोल हंबीर यांना मिळालेल्या माहितीवरून 3 आरोपींना ताब्यात घेवून त्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

Exit mobile version