। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये बुधवारी (16 फेब्रुवारी ) सकाळी एक अज्ञात व्यक्तीने कारसहीत अजित घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या व्यवक्तीला सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हा इसम आपल्या शरीरामध्ये चीप असल्याचं सांगत होता. मला कंट्रोल केलं जात असल्याचा दावा या व्यक्तीकडून केला जात होता. मात्र तपासामध्ये या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणतीही चीप आढळून आली नाही अटक करण्यात आलेली व्यक्ती ही कर्नाटकमधील बंगळुरुची आहे. दिल्ली पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाबरोबरच विशेष पथकाककडून आता या व्यक्तीची चौकशी सुरु आहे.
दहशतवाद्यांपासून धोका
डोवाल यांना अनेक दहशतवादी संघटनांपासून धोका आहे. मागील वर्षी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी डोवाल यांच्या कार्यालयाची पहाणी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.