। पुणे । प्रतिनिधी ।
बीड आणि परभणी प्रकरणाचा तपास थांबला आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच, सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी विचारला आहे.
एका सोशल मिडीयावर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणात तपास एका पॉइंटला येऊन थांबला असून तपास आता गती घ्यायला तयार नाही. बीड प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन तपासणी करण्याची घोषणा करुन 25 दिवस झालेत, परंतु, अद्यापही समिती कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का? तसेच विष्णू चाटे या आरोपीचा मोबाईल सापडला तर सर्वकाही समोर येणार आहे, परंतु या आरोपीचा मोबाईल अजूनही सापडत नाही. विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणार्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा सुद्धा का मिळत नाही? हे पोलीस यंत्रणेचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे अपयश नाही का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.