। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाकरे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. यादरम्यान, आघाडीसाठी शरद पवार नेहमीच आग्रही राहतील आणि ते प्रयत्नशीलही आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. मुंबईसह नागपूरमध्येही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. मुंबई, ठाणे, नागपूर महापालिकेची निवडणूक महत्वाची निवडणूक मानली जात असून ठाकरे गटाची ही अस्तित्वाची लढाई आहे. संजय राऊत यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी देखील दर्शवली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मात्र शरद पवार हे आघाडीसाठी आग्रही असल्याचे विधान केले आहे. शरद पवार हे आघाडीसाठी नेहमीच आग्रही असतील आणि ते प्रयत्नशीलदेखील असल्याचे ते म्हणाले आहेत.
संजय राऊत यांच्या भूमिकेविषयी बोलताना आव्हाड म्हणाले की, संजय राऊत संदर्भात मला प्रश्न विचारू नका. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आघाडी असावी कि नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. संजय राऊत हे थेट मोठ्या साहेबांशी बोलतात. उद्धव ठाकरे देखील मोठ्या साहेबांशी तसेच जयंत पाटलांशी बोलतात. त्यांनी त्यांच्या स्तरावर या गोष्टी बघाव्यात. मात्र, कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे, एक रहेंगे तो लढेंगे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका मांडली आहे.