वनविभागाच्या पावसाळी पूर्व कामात गैरप्रकार; चौकशी करण्याची मागणी

| नागोठणे | वार्ताहर |

रायगड जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या पेण, रोहा व सुधागड तालुक्यात वनखात्याकडून करण्यात येणार्‍या पावसाळी पूर्व कामात मोठ्या प्रमाणात व लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पांडापूर येथील सामाजिक कार्यकर्ते हिराजी चोगले यांनी केला आहे.

यामध्ये कामे केल्याचे दाखविण्यात आलेल्या त्या विविध प्रकारच्या कामांची रक्कम कामे न करताच संबधित ठेकेदारास अदा करण्यात आली आहे. या सर्व प्रकारात ठेकेदार व वनखात्याच्या अधिकार्‍यांचे आर्थिक साटेलोटे असल्यानेच यातील भ्रष्ट्राचाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही हिराजी चोगले यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांना दि. 7 जुलै, 2023 च्या निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी हिराजी चोगले यांनी उपवनसंरक्षक अलिबाग, यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली विविध माहितीही मागविली आहे. याबाबत बोलताना पेणचे वनसंरक्षक अधिकारी कुलदीप पाटकर यांनी सन 2022-23 या वर्षात पेण वनपरिक्षेत्र अंतर्गत विविध कामे घेण्यात आली असुन वनविभागाची सर्व कामे नियमानुसार करण्यात आली आहेत. सदर कामे पुर्ण झाल्यानंतर, सदर कामांची मोजमापे घेतल्यानंतरच देयक अदा करण्यात आली आहे. सदर कामांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नसल्याचे सांगितले.

Exit mobile version