श्रीवर्धनच्या दुष्काळाला बॉक्साईट उत्खनन कारणीभूत?

बागायती व शेतीचे अतोनात नुकसान

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

शासनाकडून श्रीवर्धन तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला असून, बाधित शेतकरी व बागायतदारांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मात्र, तालुक्यात सध्या जाणवणारा तीव्र उष्णतेचा तडाखा आणि शेती-बागांचे झालेले प्रचंड नुकसान यामागे केवळ निसर्गाचा कोप नसून, तालुक्यातील बेसुमार बॉक्साईट उत्खनन मुख्यत्वे कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत रायगडमधून श्रीवर्धनचा समावेश करण्यात आला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत, कुडगाव, मेघरे, गुळधे, वांजळे, मामवली, भरडोली, गडबवाडी, बापवली, कुरवडे आणि मारळ या भागात शासनाची मंजुरी मिळालेले अधिकृत खनिज पट्टे आहेत. मात्र, या उत्खननाचे पर्यावरणावर आणि स्थानिक हवामानावर गंभीर आणि दूरगामी दुष्परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बॉक्साईटचे साठे मुख्यतः डोंगररांगा आणि घनदाट जंगलात असल्याने उत्खननासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे हवेतील कार्बन शोषून घेणारी नैसर्गिक यंत्रणाच कोलमडून पडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

वृक्षतोड आणि अवजड यंत्रसामग्रीच्या वापरामुळे वातावरणात हरितगृह वायूंचे प्रमाण वाढून स्थानिक तापमानात कमालीची वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पाऊस अडवून भूगर्भात पाणी जिरवणारे डोंगर आता उघडे पडल्याने पावसाचे पाणी वाहून जाते, त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. बाष्पोत्सर्जनाची क्रिया मंदावल्याने पावसाने आस दिली असून, श्रीवर्धन तालुका दुष्काळाच्या छायेत लोटला गेला आहे. तसेच सुपीक मातीचा थर नष्ट झाल्याने जमीन पडीक होऊ लागली आहे.

केवळ आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. बेसुमार बॉक्साईट उत्खननाने श्रीवर्धनच्या पर्यावरणाचा बळी घेतला आहे. मुख्यत्वे उष्णता वाढीने सुपारी गळ सुरू झाली आहे. शासनाने त्याचाही पंचनामा करावा. तसेच नारळ, आंबा, काजू पीकही संकटात सापडले आहे. शासनाने या उत्खननावर तातडीने कडक नियंत्रणे आणावीत. अन्यथा श्रीवर्धन रोठा सुपारी, नारळ, आंब्यांचे उत्पादन कमालीचे घटणार असून, श्रीवर्धन तालुका हा भाताचे कोठार ही ओळखही पुसली जाईल.

वसंत यादव,
समाजसेवक, श्रीवर्धन
Exit mobile version