20 मार्चला मोर्चाचे आयोजन
। दिघी । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे या गावात सुरु असलेल्या बॉक्साईट खाणींविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या खाणींमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, तसेच स्थानिकांचे जीवनमान धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटत आहे. या विरोधात एकजुटीने लढा देण्यासाठी ग्रामस्थांनी गुरूवारी (दि.20) मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून खाण प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
खुजारे गाव आणि परिसरातील नागरिकांनी खाणींमुळे होणार्या संभाव्य धोक्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बॉक्साईट खाणकामामुळे जंगलांचे नुकसान, जलस्रोतांचे प्रदूषण आणि जैवविविधतेची हानी होण्याची शक्यता आहे. या भागातील घनदाट जंगल आणि निसर्गसौंदर्य हे स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचे आधार आहेत. शेती आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या या गावकर्यांना खाणींमुळे त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत; परंतु, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आता मोर्चाच्या माध्यमातून आपला आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. या मोर्चात गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.