उरणमध्ये आगी लागतात की लावतात?

नागरिकांमधून उलटसुलट चर्चांना उधाण

| उरण | वार्ताहर |

उरणमध्ये आग लागल्याची घटना महिनाभरात दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी होणारी भयंकर दुर्घटना नक्कीच टळली आहे. परंतु, आगी लागतात की लावल्या जातात, अशा चर्चेला उरणमध्ये उधाण आले आहे.

उरण बोरी नाका येथील अनधिकृत भंगारच्या गोदामाला भीषण आग लागण्याची घटना घडली होती. सदर आग ही तीन दिवस धुमसत होती. वेळीच ठोस उपाययोजना केली नसती अनेकांची घरे जळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या आगीत मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परेश तेरडे यांच्या घराला आगीची झळ पोहोचून त्यांचे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनीच सांगितले होते. त्यानंतर आगीबाबत पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे. यावर प्रशासनही बोलण्यास तयार नाही.

त्यानंतर सदर अनधिकृत भंगार गोदामांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बोरी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटना यांनी लावून धरली होती. परंतु, प्रशासन याकडे गांभीर्याने न पहाता त्यांनी आजतागायत कोणतीच कारवाईसंदर्भात उपाययोजना करताना दिसत नाही. यावरून अनधिकृत गोदामे उभी रहाण्यास व त्यामध्ये कोणताही ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास एकप्रकारे प्रशासनाची सहमती असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. तसे नसते तर नक्कीच प्रशासनाने या अनधिकृत गोदामांवर कारवाईचा बडगा उगारला असता. प्रशासकीय अधिकारी वर्ग काही वर्षे नोकरी करून जाणार आहेत. परंतु येथील जनतेला कायमचे वास्तव्य येथेच करावयाचे असल्याने ते गॅसच्या फुग्यांसारखे जीवन जगत आहेत. हा गॅसचा फुगा फुटला तर नक्कीच उरणचा भोपाळपेक्षाशी भयानक परिस्थितीचा सामना येथील जनतेला करावा लागेल. यावर उरणची राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधी त्यांना या परप्रांतियांची मते हवी असल्याने व तेच त्यांचे आश्रयदाते असल्याचे परप्रांतीय येथील स्थानिकांना ठणकावून सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेचा अपेक्षाभंग होताना दिसत आहे.

ही आग विझून काही दिवस होत नाही तोच आपला बाजार येथील राजमहल सिनेमागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाला शुक्रवार दि. 17 रोजी पहाटे 5 वाजता आग लागण्याची घटना घडली. सदर आग ही अग्निशमन दलाच्या जवानांनी काही क्षणातच विझवली. ती वेळीच आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. अन्यथा संपूर्ण पट्टा जळून खाक झाला असता. सदरची इमारत अत्यंत जीर्ण झाली असल्याने व अद्याप भाडेकरू असल्याने पुढील सोपस्कार होण्यास अडचण येत आहे. तर काही भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे नवीन इमारत उभी करण्यास अडचणी येत आहेत. त्यात सदर ठिकाणी आग लागण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली होती. परंतु सदर आग लागण्याचे नक्की असे कारण समजले नाही.

उरणमध्ये काही दिवसांच्या अवधीत दोन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आग लागली, का लावली असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र या दोन्ही आगी या जाणूनबुजून आपला स्वार्थ साधण्यासाठी लावण्यात आल्याच्या चर्चा उरणच्या जनतेत नाक्यानाक्यांवर सुरू आहे. याबाबत प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नसल्याने ते कारवाई सोडा या आगीचा ही सखोल तपास करतील की नाही, असा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

Exit mobile version