पवारांची हार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला शरद पवारांनी. त्यातले एकेकाळचे साधे कार्यकर्ते नेते झाले ते पवारांमुळे. 2019 च्या निवडणुकीत पक्षाला यश मिळालं ते पवार पावसात भिजल्यामुळे. थोडक्यात पवार म्हणजेच पक्ष होता. पण आता पक्ष त्यांच्यापेक्षाही मोठा झालेला दिसतो. पक्षाने राजीनामा फेटाळल्यामुळे पवारांना पुन्हा आपल्या कामावर रुजू व्हावे लागले आहे. राजीनाम्याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. लोकांची इतकी तीव्र प्रतिक्रिया येईल असं आपल्याला वाटलं नव्हतं, असं पवार म्हणाले. अनेकांना हे सगळंच नाटक वाटू शकतं. ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’सारखा प्रकार वाटू शकतो. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत त्यांच्या घराबाहेर लोकांच्या रोज रांगा लागत. यातले किती लोक खरे किती खोटे, सांगणे कठीण होते. बाळ ठाकरे यांनीही एकेकाळी राजीनामा देऊन असे शक्तिप्रदर्शन केले होते. पवारांना मात्र त्याची कधी गरज भासली नव्हती. आपल्या नेतृत्वावर आपल्याच कार्यकर्त्यांकडून शिक्कामोर्तब करुन घेण्याची वेळ त्यांच्यावर कधी आली नव्हती. त्यामुळे गेल्या चार दिवसात जे काही झाले ते बुचकळ्यात टाकणारे आहे. याचा उलगडा व्हायला कदाचित काही दिवस जावे लागतील. पवारांच्या बाबतीत जे समोर दिसते ते आणि तेवढेच खरे कधीही नसते. पवार महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही करू शकतात असा एक लोकप्रिय समज आहे. आजवर या गोष्टी इतरत्र घडत होत्या. आता आपल्याच पक्षात पवारांनी भूकंप घडवला. पडद्यामागे घडलेले काही असो, पण एक नक्की की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नाही. एकेकाळी काँग्रेस निष्ठावंतांचा गट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या कानाला लागून पवारांची कोंडी करीत असे. आता तशी कोणतीच स्थिती नसताना, आपल्या स्वतःच्याच पक्षात पवारांना हे करण्याची गरज पडली असेल तर स्थिती गंभीर आहे असं म्हणावं लागेल.
दादा एकटे पडले
शिवसेनेतील बंडाळीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या दहा दिवसात अपेक्षित आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासह काही जणांना अपात्र ठरवले जाईल असे गृहित धरून मध्यंतरी बर्‍याच घडामोडी झाल्या. अजित पवार भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करतील असे तर्क व्यक्त झाले. मी आतादेखील मुख्यमंत्री होऊ शकतो असं अजितदादांनी स्वतःच जाहीर केलं. त्यामुळे या तर्काला आणखी जोर आला. ज्यांना जायचंय त्यांनी जावं असं संदिग्ध वक्तव्य करून पवारांनी त्यात भर घातली. पक्षातील अनेक आमदार अजितदादांच्या मागे जातील असं चित्र उभं राहिलं. अजितदादा आणि पवार यांच्यात मतभेद आहेत की पवारांच्या संमतीनेच दादांचे प्रयत्न चालू आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला. पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा करण्याला ही सर्व पार्श्‍वभूमी होती. राजीनाम्याच्या घोषणेच्या वेळचे चित्रही बरंच सूचक होतं. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रडू लागले. आपल्याला यापुढे पक्षात वाली कोण असे त्यांना वाटले व त्यांनी ते जाहीरपणे बोलून दाखवलं. त्यावेळी अजित पवार शेलारमामाच्या भूमिकेत होते. तुमचे दोर आता कापून टाकले आहेत असं म्हणण्याचं तेवढं बाकी होतं. हे कधी ना कधी होणारच असं ते म्हणत होते. अशी भाषा एरवी कोणत्या प्रसंगी वापरतात हे वेगळं सांगायला नको. पक्षाची सूत्रे आपल्याकडे घेण्यासाठी दादा एकदम उत्सुक आणि सज्ज आहेत हे त्यातून स्पष्ट दिसत होतं. हेच दादा शुक्रवारी राजीनामा मागे घेतला गेला तेव्हा मात्र गायब होते. राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांच्याखेरीज दुसर्‍या कोणाचंही नेतृत्व मानायला तयार होणार नाहीत हे मधल्या काळात दिसलं होतं. दादांच्या सोबत जाण्याची तयारी केलेल्या आमदारांनाही त्यामुळे योग्य तो संदेश मिळाला असावा. त्यामुळेच पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा दादा एकटे पडले असावेत.
शेवटचे अस्त्र
हे सर्व असंच झालं असेल तर यातून पवारांची ताकद दिसली तशीच त्यांची असहायताही स्पष्ट झाली. पडद्याआडच्या मसलतींमध्ये दादा पवारांना जुमानत नाहीत याची ही लक्षणे आहेत. म्हणूनच पवारांना हे सगळं जाहीररीत्या घडवून आणावं लागलं. याचाच अर्थ, अजितदादा आणि त्यांचे सवंगडी हे आता त्यांच्या आज्ञेत राहिलेले नाहीत. आज कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे या कथित बंडखोरांनी तात्पुरती माघार घेतली असेल. पण यापुढे ते पक्षात राहूनच पवारांना शह देण्याचा प्रयत्न करतील. हे प्रयत्न ढोबळ नसतील. सूक्ष्मपणे पाहणार्‍यालाच दिसतील. येत्या काळात त्यांच्यावर लक्ष ठेवून राहायला हवे. एका अर्थाने, राजीनामा हे पवारांचे अखेरचे अस्त्र होते. ते वापरून झाले आहे. पुन्हा वापरू गेले तर त्याचा परिणाम दिसणार नाही. शिवाय आजचा काळ आणि वय हे पवारांच्या बाजूने नाही. पवार आणि दादांमधील रस्सीखेच ही राष्ट्रवादी कोणाच्या ताब्यात इतक्यापुरतीच मर्यादित नाही. हा खरा विचारसरणीचाच संघर्ष आहे. पवारांचे मोदींपासून अदानींपर्यंत सर्वांशी उत्तम संबंध आहेत आणि राजकारण हा त्यांच्या लेखी व्यवहार आहे. तरीही आपण एक विशिष्ट विचारांचे राजकारण करतो अशी प्रतिमा उभी करण्यात त्यांनी यश मिळवले. या प्रतिमेमुळेच आजही ते हिंदुत्ववादी राजकारणासोबत सहजासहजी जाऊ शकत नाहीत. तरुणपणातील संस्कारांमुळे त्यांना ते झेपणारेही नाही. याउलट, अजितदादांना भाजप हा काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षांसारखाच एक पक्ष वाटतो. दादांनी पवारांच्या राजकारणातला व्यवहार आत्मसात केला आणि बाकीचे भान सोडून दिले. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाची त्यांना काहीही अडचण होत नाही. हीच स्थिती राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची व कार्यकर्त्यांची आहे. आज पवारांच्या दडपणामुळे ते महाविकास आघाडी वगैरेची भाजपविरोधी भाषा बोलत आहेत. पण उद्या इडी-सीबीआय यांचा दबाव वाढू शकतो. सत्तेसोबत राहणे अधिक सोईचे वाटू शकते. या मंडळींनी उठाव केलाच तर तो रोखण्यासाठी पवारांकडे फारशी शस्त्रे शिल्लक नसतील. त्यामुळे राजीनामा-नाट्यानंतर ‘मी जिंकलो, मी हरलो’ अशी पवारांची स्थिती आहे.

Exit mobile version