सहा महिन्यांपूर्वी बांधलेले शौचालय, बसथांबा तोडणार
| पनवेल | दिपक घरत |
सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या कामामुळे या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले सार्वजनिक शौचालय आणि आधुनिक बस थांबा बाधित होण्याची शक्यता आहे. लाखो रुपये खर्च करून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले शौचालय आणि बसथांबा तोडावा लागणार आहे. मात्र, याची पालिकेला कल्पना नव्हती का? आणि होती तर जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी प्रशासनाकडून का करण्यात आली, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
शिव-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामाकरिता या भागातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही बांधकामदेखील यात बाधित होणार असल्याने संबंधित बांधकामधारकांना त्याबाबतची माहिती नोटीसद्वारे देण्यात आली होती. असे असताना पालिकेच्य माध्यमातून विस्तारीकरण केले जात असलेल्या भागातील सार्वजनिक शौचालायचे नव्याने बांधकाम करण्यात आले.आता मात्र विस्तारीकरणाच्या कामात नव्याने बांधलेले हे शौचालय बाधित होण्याची शक्यता असल्याने शौचालय बांधण्यासाठी 30 ते 35 लाख रुपये खर्च करून तसेच बस थांबा उभारण्यासाठी लाखो रुपये खर्चून पालिकेने काय साधले, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पालिकेच्या माध्यमातून शिव - पनवेल महामार्गांवर कळंबोली मॅकडोनाल्ड आणि कोपरा टोल नाका आशा दोन ठिकाणी जवळपास 70 लाख रुपये खर्च करून आधुनिक शौचालय उभारण्यात आली आहेत.
30 ते 35 लाख रुपये खर्चून सहाच महिन्यापूर्वी बांधण्यात आलेले शौचालय पुलाच्या कामात बाधित होणार आहे याची पालिकेला कल्पना न्हवती का? आणि होती तर जनतेच्या पैशाचा असा उधळा प्रशासना कडून का करण्यात आला.
प्रदीप ठाकूर,
विधानसभा समन्वयक, शिव सेना उद्धव ठाकरे
सार्वजनिक शौचालय बाधित होऊ नये या करता प्रशासन प्रयत्न करत आहे. तशा स्वरूपाची बोलणी संबंधित बांधकाम विभागासोबत सुरु आहेत.
डॉ. वैभव विधाते.
उपायुक्त.
