ग्रामस्थांमध्ये भीती, महसूल प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सांगवी हे गाव नुकतेच दरडप्रवण गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीच्या काळात येथे डोंगराच्या बाजूला माती सैल होऊन वाहून आली होती. त्यामुळे तळीये गावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असल्याचे चित्र आहे. मात्र, या गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरात दगडखाणी असून, त्यात स्फोट घडविले जातात. त्यामुळे दरडींचा धोका वाढला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. तेव्हा ही बाब चिंता वाढवणारी ठरली असून, महसूल प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जत तालुक्यातील सांगवी हे गावदेखील दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आले आहे. सांगवी गावाला भूस्खलनाचा धोका असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कर्जत तालुक्यातील भारतीय भूवैज्ञानीक सर्वेक्षण विभागाने कळविल्याप्रमाणे भूस्खलन होणार्या गावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेस गावात भूस्खलनाचा धोका असल्यामुळे गावातील नागरिकांस सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यास सूचित केले आहे.
सांगवी गावाच्या डोंगराच्या मागील भागात दगडखाणी असून तेथे दगड काढण्याचे काम चालते. या ठिकाणी सुरुंग स्फोट केले जातात. त्याचा हादरा इतक्या मोठ्या प्रमाणात बसतो, की घरात तडे गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती. त्यामुळे सांगवी हे गाव दरडप्रवण होण्यास या दगडखाणी जबाबदार आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे असल्यास महसूल विभाग यावर काय भूमिका घेते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. तर याबाबत महसूल विभागाची भूमिका जाणून घेण्यासाठी कर्जत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आमच्या डोक्यावर दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. या पावसात आम्ही रात्रभर झोपू शकलो नाही. त्यामुळे आमचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे.
कृष्णा पवार, ग्रामस्थ