निवडणूक आयोगाच्या पत्रावर पाच दिवसांनंतरही सस्पेन्स
| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत सुनील तटकरे यांचे नाव नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून, चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अद्याप सुधारणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे सुनील तटकरे यांना जाणीवपूर्वक साईडलाईन केलं जात आहे का? असा सवाल उपस्थित केला जाता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची यादी सादर करण्यात आल्याचं पत्र सध्या चर्चेत आहे. या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव असून, जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पक्षाचे प्रमुख नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावे कार्यकारिणीत नसल्याचं दिसून आल्यानं तर्क-वितर्कांना वेग आला. 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अरूणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांचा नावासमोर प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख आहे, पण त्याच फळीत वरती सुनील तटकरे यांच्या नावासमोरचे प्रदेशाध्यक्ष हे पद नाही.






