दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

कोंढेपंचतन ग्रामस्थांकडून संताप व्यक्त

| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रामपंचायत हद्दीतील कोंढेपंचतन परिसरात सुरू असलेल्या दगडखाणीविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत खाण कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत यासंदर्भात ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. सदर दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वदरहस्त असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संताप व्यक्त करण्यात आला आहे.

ग्रामसभेत ग्रामस्थांनी खाणकामामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणावर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना श्वसनाचे त्रास वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच खाणीतून होणाऱ्या सततच्या स्फोटांमुळे परिसरातील घरांना तडे जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आंबा व काजू बागांवरही या प्रदूषणाचा परिणाम होत असून, उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

खाणकामामुळे भूजल पातळी घटत असल्याने विहिरी कोरड्या पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गुरचरण जमिनीवर टाकण्यात आलेल्या भरावामुळे जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, अपघाताचा धोका वाढला आहे. ग्रामस्थांनी महसूल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “प्रशासनाच्या वरदहस्तामुळेच ही खाण सुरू आहे,” असा आरोप केला. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने संताप अधिकच वाढला आहे.

दरम्यान, दीर्घकाळानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिलेल्या या ग्रामसभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत, खाण तातडीने बंद न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे सांगितले आहे. आता प्रशासन या ठरावावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version