बोर्ली ग्रामपंचायतीची तहसीलदारांकडे तक्रार; अधिकार्यांचे मात्र कारवाईकडे दुर्लक्ष
| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरावर सध्या पाणीसंकट आले आहे. रस्त्याच्या कामात कोंढेपंचतन धरणातून येणारी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा होत नाही. तर, दुसरीकडे कार्ले नदीपात्रातून रेझगा उपशामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून रेझगा उपसा करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कार्ले नदीपात्रातून बोर्लीपंचतन, दिवेआगर व भरडखोल या गावांना वर्षानुवर्षे सुरळीत पाणीपुरवठा मिळत आहे. मात्र, मागील दिवसात येथील पाणी साठवलेल्या विहिरींच्या परिसरात रेझगामाफियांकडून बेसुमार उपसा होत आहे. त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे साठवणूक केलेल्या विहिरीतील पाणी नदीत मिसळत आहे. एकूणच, गढूळ पाण्यासह जलस्त्रोत असलेल्या पाणीपातळीला धोका निर्माण झाल्याने बोर्लीपंचतन शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
बोर्ली ग्रामपंचायतीकडून दि.13 रोजी रेझगा उपसा करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, अठरा दिवस उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने रेझगामाफियांची दहशत वाढत आहे. या दुर्लक्षतेमुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून, ऐन पावसाळ्यात बोर्लीकरांच्या वाटेला पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.
कार्ले नदीतील बेकायदा खनिज उपसा थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. लवकरच कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे.
– शंकर मयेकर, ग्रामसेवक