| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्कात दहा टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतात देशांतर्गत एकूण वनस्पती तेलाच्या मागणीपैकी 70 टक्क्यांहून अधिक तेल आयात केले जाते. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल खरेदी करतो. तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेन येथून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते. याआधी, सरकारने कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत खाली आणले होते. आता नवीन निर्णयामुळे तिन्ही प्रकारच्या तेलांवरील एकूण आयात शुल्क 27.5 टक्क्यांवरून 16.5 टक्के होईल.