| मुंबई | प्रतिनिधी |
हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे, अशी मुक्ताफळं राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उधळली आहेत. हिंदी भाषा आमची लाडकी बहीण आहे. मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी फक्त हिंदीतच बोलतो, असेही ते म्हणाले. यामुळे त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.
भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर परप्रांतियांची मराठी कुटुंबांवरील मुजोरी वाढल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी “घाटकोपरची भाषा गुजराती असून, मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असे नाही,’’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता भाजपच्या वळचणीला बसलेल्या शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर थेट हिंदी ही मुंबईची बोलीभाषा असल्याचीच मुक्ताफळं उधळली आहेत. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी, कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो, पण जेव्हा मिरा-भाईंदरमध्ये जातो, तेव्हा हिंदी बोलतो. मराठी आमची मातृभाषा, आमची माय असे आपण म्हणतो, पण हिंदी ही आपली लाडकी बहीण आहे, असे प्रताप सरनाईक एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.