स्थानिक प्रशासनाची अनास्था, तर अधिकार्यांचा कानाडोळा
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील अंतर्गत रस्ते कित्येक वर्षे दुर्लक्षित आहेत. सध्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे उखडलेल्या रस्त्यांची पायवाट ही जीवघेणी ठरत आहे. मात्र, संबंधित प्रशासनाला काही पडली, ना लोकप्रतिनिधीना. रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी अखेर कुणाची, असा संतप्त सवाल बोर्लीकरांकडून करण्यात येत आहे.
बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांचा आठ महिन्यांपूर्वी कार्यकाळ संपला असून सद्या येथील कारभार प्रशासक पाहत आहे. मात्र, मागील वर्षात रस्त्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शहराचा विकास खुंटला आहे. दिवेआगर पर्यटन स्थळामुळे बोर्लीपंचतन शहराची एक वेगळी ओळख आहे. मात्र, शहराच्या अंतर्गत रस्त्यांची स्थिती पाहता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बोर्ली-कोंढेपंचतन मार्ग, चिंचबादेवी मंदिर मार्ग तसेच बोर्लीपंचतन-वांजळे मार्ग या मुख्य रस्त्यांकडे कित्येक वर्षे दुर्लक्ष होत असल्याने सद्यस्थितीत येथील पायी प्रवास प्रवाशांचा अंत पाहणारा ठरू लागला आहे. आता तरी हे रस्ते दुरुस्त होणार की, नाही. नाहीतर तसेच ठेवणार का, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
बोर्लीपंचतन अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी ही कोणाची असेल याच संभ्रम बोर्लीकरांना कायम आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे मात्र, ‘ना देणे ना घेणे’ असे वागणे दिसत आहे. या रस्त्यांसोबत छोटे-मोठे साकव देखील खचले आहेत. सद्यःस्थितीत रस्ते बनले नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. बोर्लीपंचतन ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मधून रस्ता व्हावा अशी मागणी केली आहे. मात्र, निधी अभावी रस्ते रखडल्याचे सद्या ग्रामपंचायतीवर ताबा असणार्या प्रशासकाकडून सांगण्यात येत आहे.
विकासापासून कोसो दूर
गेली कित्येक वर्ष रस्त्याचे काम न केल्याने खड्डी बाहेर पडून यावर चालणे कठीण झाले आहे. हा प्रकार अत्यवस्थ रुग्णांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो. मात्र, रस्ते दुरुस्तींची मागणी सातत्याने होत असताना या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे या शहराची विकसित शहर म्हणून ओळख पुढे येत असली तरी मुलभूत सुविधांपासून येथील नागरिक कोसो दूर आहेत.